चला शेअर बाजाराकडे....
काही लेख वाचनीय असतात, परंतु काही लेख फायदे देतात.
मराठी माणूस कमी होणा-या व्याजदरामुळे त्रस्त झाला आहे. गुंतवणूक कोठे करावी या चिंतेत गुंतून गेला आहे. अशावेळी कॉपी करण्याची गरज असते. परीक्षेत कॉपी करणे वाईट, परंतु नवीन व्यवस्थापन शास्त्र म्हणते, यशाकरिता तुम्ही यशस्वी माणसांची कॉपी करा. हा सर्वात सहज यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे.
आता प्रश्न असा आहे की, मराठी माणसांनी गुंतवणुकीत यशस्वी होण्याकरिता कोणाची कॉपी करावी? उत्तर सोपे आहे, गुजराथी माणसाची. पैशाला कसे कामाला लावावे व पैशापासून कसा पैसा बनवावा याची कला गुजराथी समाजाला चांगली अवगत आहे व याकरिता ते ज्या साधनाचा वापर करतात त्याला म्हणतात “शेअर बाजार”.
मराठी माणूस म्हणेल, शेअर बाझार नको रे बाप्पा! शेअर बाजार म्हणजे सट्टा! लगी तो छ्कडी नही तो लकडी. मी मराठी माणसाचा कल्याणमित्र असल्याने मी म्हणतो की, ही धारणा चुकीची आहे. मी मान्य करतो की, तुमच्या अवतीभवती अशी कितीतरी उदाहरणे असतील की, ज्यांनी शेअर बाजारात पैसा लावला व तो बुडाला. ज्यांचा पैसा बुडाला त्याला ते स्वतःच जबाबदार आहेत, शेअर बाजार नाही. कारण शेअर बाजारात पैसा लावणे हा एक बुद्धिबळासारखा खेळ आहे. ज्याप्रमाणे तुम्ही कितीही बुद्धिमान असलात व बुद्धिबळाच्या खेळाचे नियम तुम्हाला माहित नसतील, तर तुम्ही हराल. अगदी त्याप्रमाणे शेअर बाजारचे नियम तुम्हाला माहित नसतील तर तुमचा पोपट होईल.
ज्यांनी आपले रुपये शेअर बाजारात गमावले ते सर्व खिलाडी नव्हते, तर अनाडी होते. नाही तर ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झले होते किंवा घाई करून पी हळद हो गोरी करायला गेले होते.
ज्यांनी आपले रुपये शेअर बाजारात गमावले त्यांना फक्त खालील प्रश्न विचारा.
१) जे शेअर तुम्ही घेतलेत ते शेअर बाजारातील प्रथम १०० कंपनीपैकी
शेअर होते काय?
२) जो आय.पी.ओ. तुम्ही घेतलात तो नावाजलेल्या ग्रुपचा होता का?
३) जर दोन्ही उत्तरे हो असतील तर तो तुम्ही किती वर्षे ठेवलात की
मंदीची आवई येताच विकलात व नंतर पस्तावलात?
४) शेअर घेताना तुम्ही त्या शेअरचा हाय / लो, पी.इ., इ.पी.एस., परफौर्मेन्स चा अभ्यास केलात, की फक्त टिप्सवर शेअर खरेदी केला?
वरील प्रश्नाची उत्तरे प्राप्त होताच तुम्हाला कळेल की, पैसे शेअर बाजाराने नव्हे तर गुंतवणूकदाराने आपल्या चुकीने बुडविले आहेत.
तर मराठी माणसाने चुका न करता आपले रुपये शेअर बाजारात कसे लावावेत व त्यापासून कमीत कमी वर्षाला २० % फायदा कसा प्राप्त करावा याचेच मार्गदर्शन या लेखमालेतून वाचकांना करण्यात येणार आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या परिवाराचा मेडिक्लेम व कमवत्या व्यक्तीने स्वत:चा विमा उतरवणे गरजेचे आहे. कारण आजार व मृत्यू सत्य आहेत व ते आपण रोखू शकत नाही, मात्र त्याची तीव्रता कमी करू शकतो. तेव्हा हे करून जी रक्कम उरेल ती तुम्ही शेअर बाजारात लावा.
शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खूप मोठी रक्कम असण्याची गरज नाही. अगदी प्रतिवर्ष रु.३००० /- गुंतवणुकीस सुरुवात केलीत व चांगल्या कंपनीचे शेअर घेतलेत तरी तुम्ही प्रतिवर्ष २० % वाढ संपत्तीत पहाल. जर तुमच्या हाती मल्टीपल होणारा शेअर लागला तर तेवढ्याच गुंतवणुकीत तुम्ही लखपती / करोडपती देखील होऊ शकतात.
उदा.: ज्याने १ जानेवारी १९९६ रोजी रु. १००० चे फक्त्त इन्फोसिस टेक्नोलोजीसचे शेअर घेतले असतील, तर ३१ डिसेम्बर २००५ रोजी त्याचे मूल्य रु. १,२५,०००/- झाले होते. सांगा कोणती गुंतवणूक तुम्हाला इतका परतावा देऊ शकेल?
अशा मल्टीपल करणा-या कंपन्या कोणत्या, हे सांगण्याचे काम आम्ही करू. शेअर बाजारातील नियम व मार्गदर्शनाचे काम आम्ही करू, परंतु वाचनाचे व निर्णय घेण्याचे काम मात्र तुम्हालाच करावे लागेल.
हा लेख तुम्हाला शेअर बाजारचे महत्व सांगण्यात व तुमची मनोवृत्ती बाजारासाठी तयार करण्याकरिता होता. पुढील लेखात आपण शेअर व शेअरचे प्रकार यांची माहिती घेऊया. याशिवाय आठवड्याचा शेअर सुद्धा सांगण्यात येईल. तर तयार रहा शेअर बाजारचा खिलाडी बनण्याकरिता; कारण आपण आता गुजराथी समाजाची मक्तेदारी मोडून शेअर बाजारात मराठी माणसाचा ठसा उमटवण्याचे काम करणार आहोत. तेव्हा बेस्ट ऑफ लक!
-कल्याण मित्र
You Are right Sir
उत्तर द्याहटवाkhupach chaan
उत्तर द्याहटवाMast..
उत्तर द्याहटवाI like sir
उत्तर द्याहटवाplz update new information
उत्तर द्याहटवाNice sir
उत्तर द्याहटवाUseful post Thanks for sharing Share Market Basic Knowledge In Marathi
उत्तर द्याहटवा